Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे, अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत, काँग्रेस समोर अस्तित्वाचा प्रश्न

अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.

Ashok Chavan, Sushilkumar Shinde (Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल भाजपसाठी 'अच्छे दिन' दाखवणारे तर, काँग्रेससाठी चिंताजनक आहेत. महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्षाची अवस्था प्रचंड दयनीय म्हणावी अशी झाली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा निवडणूक आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नांदेड येथून अशोक चव्हाण तर सोलापूर येथून सुशिल कुमार शिंदे हे पराभवाच्या छायेत आहेत. चव्हाण आणि शिंदे हे दोघेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ तितकेच महत्त्वाचे नेते. त्यात चव्हाण यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद. त्यामुळे हा निकाल काँग्रेससाठी अत्यंत धक्कादायक आहे.

नांदेड हा काँग्रेस आणि पर्यायाने अशोक चव्हाण यांचा गढ मानला जायचा. 2014 मध्ये असलेल्या काँग्रेस विरोधी लाटेतही चव्हाण यांनी आपला गढ कायम राखला होता. 2019 मध्ये तशी काँग्रेस विरोधी लाट फारशी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या जागेहून अशोक चव्हाण सहज विजयी होतील अशी राजकीय वर्तुळ आणि काँग्रेसच्या गोटातही चर्चा होती. प्रत्यक्ष मतमोजणीत मात्र भलतेच वास्तव पुढे येताना दिसत आहे. इथे भाजपचे प्रताप चिखलीकर आघाडी घेताना दिसत आहे. ही आघाडी इतकी मोठी आहे की, अशोक चव्हाण सध्या पराभवाच्या छायेत आहेत.

दरम्यान , सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे देखील पराभवाच्या छायेत आहेत. इथे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि काँग्रेसचे सुशिल कुमार शिंदे असा सामना रंगला होता. खरी लढत सुशील कुमार शिंदे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट लढत होईल असे चित्र होते. प्रत्यक्ष मतदमोजणीत मात्र भाजपचे जयसिद्धेश्व स्वामी विरुद्ध सुशील कुमार शिंदे असा सामना होताना दिसतो आहे. या सामन्यात सुशील कुमार शिंदे पराभावाच्या छायेत आहेत. (हेही वाचा, LIVE महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: शिवसेनेचे अनंत गीते यांना धक्का; रायगडमधून सुनील तटकरे विजयी)

दरम्यान, देशभरातून मतमोजणीची आकडेवारी हाती येत आहे.  अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.  त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.