Lok Sabha Election 2024: महायुतीत जागावाटपावरून धुसफूस; एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक, भाजपला इशारा

महायुतीमध्येही जागावाटपावरुन (Mahayuti Seat Allocation) जोरदर धुसफूसअसल्याची चर्चा आहे. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक आक्रमक असल्याचे समजते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीस (Loksabha Election 2024) सामोरे जात असताना अनेक राजकीय पक्ष युत्या, आघाड्या करुन लढण्याच्या विचारात आहेत. राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकासआगाडी जागावाटप कसे करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याच्या अनेक बातम्याही प्रसारमाध्यमांतून येतात. याचा अर्थ महायुतीमध्ये (Confusion in Mahayuti) सर्वच काही अलबेल आहे असे नव्हे. महायुतीमध्येही जागावाटपावरुन (Mahayuti Seat Allocation) जोरदर धुसफूसअसल्याची चर्चा आहे. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक आक्रमक असल्याचे समजते. जागावाटपाच्या ज्या सूत्राची चर्चा सुरु आहे त्यावरुन तिखट प्रतिक्रिया देताना आम्ही भाजपच्या दावणीला बांधलो नसल्याचे शिंदे गटातील एका खासदाराने म्हटले आहे.

गजानन किर्तीकर यांच्याकडून नाराजी व्यक्त

महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला केवळ 12 जागा मिळणारअसल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला अजि पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस 4 तर भाजप 32 जागांवर लढणार आहे. शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसून नेत्यांची अस्वस्थता वाढल्याचे समजते. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या कथीत फॉर्म्युल्याबद्दल शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील खासदार गजानन किर्तीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर हा फॉर्म्युलाच आम्हाला मान्य नाही. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या संतापास स्वपक्ष आणि मित्रपक्ष किती महत्त्व देता याबाबत उत्सुकता आहे.

भाजपला थेट इशारा

गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आम्ही 22 जागा लढलो होतो. त्यापैकी 18 जागांवर आम्ही विजय मिळवला केवळ 4 जागा पराभूत झालो. असे असताना या निवडणूक केवळ 12 जागा कशा घेणार? असा सवाल करत किर्तीकर संताप व्यक्त करतात. आम्ही (शिवसेना) भाजपच्या दावणीला बांधलो नाही, असा इशाराही ते भाजपला देतात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा द्याव्यात असा प्रस्ताव आहे. त्याला शिवसेना तयार होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रसारमाध्यमांतून सुरु असलेल्या चर्चांनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार आहे. सर्वसाधारणपण तो 32-12-4 असा आहे. म्हणजे भाजप-32, शिवसेना-12 आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी- 04 अजित पवार गटाकडून या जागावाटपावर विशेष भाष्य झाले नाही. मात्र, शिंदे गटात मात्र जागावाटपावरुन नाराजी असल्याचे समजते. शिंदे गटासमोरील सर्वा मोठे आव्हान आहे ते म्हणजे मागच्या वेळी 22 जागा लढल्या त्यातील 18 जिंकल्या. त्यापैकी बहुतांश खासदार शिंदे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे युतीच्या जागावाटपात गमवायच्या तर कोणत्या जागा गमवायच्या आणि तेथील खासदार, उमेदवारास नाराज करायचे?