जांब समर्थ येथील राम मंदीरातील मूर्त्या अद्यापही गायब; गावकर्यांनी सुरू केलं अन्नत्याग आंदोलन
गावकर्यांना 22 ऑगस्टच्या सकाळी आरतीच्या वेळेस मूर्त्या जागेवर नसल्याचं दिसलं नंतर त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
जालना (Jalna) मधील जांब समर्थ (Jamb Samartha) येथील राम मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी राम, लक्ष्मण, सीता , बजरंग बली यांच्यासह 6 मूर्त्या चोरांनी लंपास केल्या आहेत. या घटनेला 48 तास उलटले तरीही चोरांचा ठावठिकाणा लावण्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे आज गावकर्यांनी संतापून अखेर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. काल (23 ऑगस्ट) या घटनेचा निषेध म्हणून गावकर्यांनी देव देवतांची नियमित आरती टाळली आणि आज त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
राम मंदिरामधील मूर्त्या शोधण्यासाठी पोलिसांची 7 पथकं रवाना करण्यात आली आहेत. कालच गावकर्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता.
जालना मधील घनसावंगी तालुक्यातील प्रसिद्ध जांबसमर्थ मंदिर प्राचीन आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी 1535 मध्ये या मूर्तींची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली होती. या पंचधातूच्या मूर्त्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणाची दाखल घेत मूर्ती लवकरात लवकर शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
21 ऑगस्टच्या मध्यरात्री राम मंदिरामधून मूर्त्या चोरीला गेल्याचा अंदाज आहे. गावकर्यांना 22 ऑगस्टच्या सकाळी आरतीच्या वेळेस मूर्त्या जागेवर नसल्याचं दिसलं नंतर त्यांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.