Liquor Party: नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये चालू होती दारू पार्टी; तक्रार करायला गेलेल्या नागरिकांना दृश्य पाहून बसला धक्का (Watch Video)
या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी पोलिसांची चौकशी करण्यात येणार असल्याचे, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. या चार पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली

महाराष्ट्रातील नाशिकमधील (Nashik) गंगापूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वसामान्यपणे काही समस्या असेल किंवा कोणाबाबत काही तक्रार करायची असेल तर आपण पोलिसांकडे धाव घेतो. मात्र आपली तक्रार घेऊन तुम्ही पोलिसांकडे गेलात आणि स्टेशनमध्ये ते दारूच्या नशेत असलेले दिसले तर? मंगळवारी रात्री गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकीमध्ये काही नाशिककरांना हेच दृश्य दिसले. याठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दारू पार्टी करताना आढळून आले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डी. के. नगर परिसरात रात्रीच्या वेळी काही लोक दारुच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा घालत होते. परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असल्याने, त्यांनी याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. मात्र तिथे पोहचल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चौकीत टेबलवर दारुच्या बाटल्या, भरलेले ग्लास आणि खायचे पदार्थ ठेवले होते.
पोलिसांच्या या दारू पार्टीचे व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने, रात्री सव्वा दहाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस चौकीला भेट दिली. त्त्यांनी नागरिकांना घडलेल्या प्रकरणाबाबत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक तिथून बाहेर पडले.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार पोलीस त्यांची ड्युटी संपल्यानंतर पोलीस ठाण्यात दारू पीत होते. गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दारू पिऊन असल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने घटनास्थळ गाठून हा व्हिडिओ बनवला. दृश्य नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सरळ उभेही राहता येत नसल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे. (हेही वाचा: Mumbai Police: क्राईम इंटेलिजन्स युनिटची मोठी कारवाई; पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी खंडणी प्रकरणात फरार घोषित)
या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी पोलिसांची चौकशी करण्यात येणार असल्याचे, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. या चार पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. हा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून ते लवकरच त्याचा अहवाल देतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)