Lalbaugcha Raja 2023: यंदाची लालबागचा राजाची मूर्ती वादाच्या भोवऱ्यात; मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, जाणून घ्या कारण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाप्रमाणेच सजवलेल्या सिंहासनावर यंदाचा गणपती विराजमान झाला आहे.
मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) गणपती हा राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. दरवर्षी गणेशोत्सवाआधी लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडतो. आताही शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 7 वाजता यंदाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर यंदाची मूर्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लालबागच्या राजाच्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराजमुद्रा कोरली आहे. यामुळे यावर सकल मराठा समाज महाराष्ट्राने आक्षेप घेतला आहे.
याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. मंडळाने 14 फूट उंच मूर्तीची पहिली झलक दाखवल्यानंतर, गणपतीच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आल्याची बाब शिवप्रेमींना खटकली.
मूर्तीचे पहिले दर्शन घडवताना मंडळाने जाहीर केले की, लालबागचा राजाची या वर्षीची थीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिनाभोवती केंद्रित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाप्रमाणेच सजवलेल्या सिंहासनावर यंदाचा गणपती विराजमान झाला आहे. मात्र त्याच्या पायावर राजमुद्रा कोरल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
या गोष्टीकडे सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीने लक्ष वेधणारे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मुंबई पोलिसांना उद्देशूनन समूहाने म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला त्यांचा ह्या पाठचा नेमका हेतू काय होता हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे. लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे देव देव्हाऱ्यात आहेत आणि ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायावर पहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे. कृपया आपण संबधित गोष्टीची खात्री करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा ही विनंती या अर्जाव्दारे करीत आहे. यात देवाला किंवा धर्माला विरोध नाही आहे लक्षात घ्यावे आणि गैरसमज नसावा.’ (हेही वाचा: Ganpati Sthapana Vidhi Muhurat 2023: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी? जाणून घ्या गणपती स्थापना मुहूर्त आणि विधी)
अहवालानुसार हे पत्र व्हायरल झाल्यानंतर लालबागच्या राजा मंडळाकडून याबाबत दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यांनी पायावरील राजमुद्रा काढून टाकली आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही.