Lalbaugcha Raja 2022 : 'लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करा' दिवंगत लेकीची शेवटची आठवण शेअर करणारं माऊली चं जीवाला चटका लावणारं पत्र वायरल!
पुढल्या वर्षी बाक किंवा खूर्च्या उपलब्ध असतील तर तिच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत असं त्यांनी लिहलं आहे.
महाराष्ट्रामध्ये 31 ऑगस्ट पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. यंदा कोरोनाचं संकट आटोक्यात असल्याने निर्बंधमुक्त वातावरणामध्ये सण साजरा केला जात आहे. मुंबईत लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हा भाविकांचा विशेष आकर्षण आहे. यंदा 2 वर्षांनी तो पुन्हा भव्य रूपात भाविकांच्या भेटीला आला असल्याने पहिल्या दिवसापासून बाप्पाच्या दर्शनाची लांबच लांब रांग पहायला मिळत आहे. याच गर्दीचा आणि लांब रांगेशी निगडीत एका आईचं जीवाला चटका लावणारा पत्र वायरल होत आहे.
सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या पत्रामध्ये कल्पना कलमाणी यांनी आपल्या लेकीची गोष्ट सांगितली आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्यात 2019 साली कल्पना आणि त्यांची लेक 8 तास उभ्या होत्या. रांग पुढेच सरकत नसल्याने कल्पना यांच्या लेकीने जवळच असणार्या एका सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली तेव्हा त्यांच्यामध्ये झालेल्या संभाषणामध्ये सिक्युरिटी गार्ड कडून काही जिव्हारी लागणार्या भाषेचा वापर झाला. त्यानंतर तिने आईला घेऊन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तिचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्या रात्री तिने गळफास घेऊन जीव दिला. दरम्यान या पत्रामध्ये कल्पना यांची लेक रांगेत उभी असताना काढलेलं चित्रं देखील पहायला मिळत आहे. कल्पना यांच्या मुलीने नवसाच्या रांगेत उभे असलेल्यांसाठी बसण्याची सोय असावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कल्पना यांच्या लेकीला ही बाब मंडळापर्यंत पोहचवायची होती. ते चित्र तिला पेटीत टाकायचं होतं. Lalbaugcha Raja 2022: लालबागचा राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी महिला भाविक- सुरक्षारक्षक भिडले .
कल्पना यांनी आपल्या मुलीची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढल्या वर्षी बाक किंवा खूर्च्या उपलब्ध असतील तर तिच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत असं त्यांनी लिहलं आहे.
लालबागचा राजा एका चिंचोळ्या गल्लीत विराजमान होतो. दरवर्षी त्याच्या दर्शनाला मुंबई प्रमाणेच देशा-परदेशातून भाविक हजेरी लावतात. यामध्ये सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे.