Lalbaugcha Raja 2019 Collection:'लालबागचा राजा' ला 6 कोटीचे दान; भारताची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे यंदा दान रोडावले

मागील वर्षीच्या तुलनेत भाविकांनी राजा चरणी दान केलेल्या रकमेत घट झाली आहे. लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत यंदा रोख रक्कम 5.05 कोटी आले असून सोने,चांदी यांसारख्या असंख्य वस्तूंसह एकूण 6.55 कोटी दान जमा झाले आहे.

Lalbaugcha Raja (Photo Credits: Facebook)

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था याचा परिणाम यंदा लालबागचा राजाच्या दानपेटीवरही झाला. मागील वर्षीच्या तुलनेत भाविकांनी राजा चरणी दान केलेल्या रकमेत घट झाली आहे. लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत यंदा रोख रक्कम 5.05 कोटी आले असून सोने,चांदी यांसारख्या असंख्य वस्तूंसह एकूण 6.55 कोटी दान जमा झाले आहे. मुंबई मिरर ने दिलेल्या वृत्तानुसार, हे दान मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून मुंबईतील (Mumbai) मुसळधार पाऊस या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

लालबागचा राजा हा मुंबईची शान असून या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी आपण मनोकामना पुर्ण व्हावी किंवा आपली इच्छा पूर्ण केली म्हणून असंख्य भाविक राजा चरणी पैसे, सोने, चांदीच्या रुपात काही ना काही गोष्टी दान करतात. हे दान जवळपास कोटींच्या घरात असते. यंदाही हे दान कोटींच्या घरातच गेले आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेने हे दान कमी असून पाऊस आणि देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. हेही वाचा- Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2019: लालबागचा राजा 2019 ला भाविकांनी दिला 21 तासांच्या मिरवणूकीनंतर गिरगाव चौपाटीवर निरोप

यंदा लालबागच्या राजाला 5.05 करोड रोख रक्कम तसेच सोने, चांदीच्या वस्तूंसह 6.55 कोटी इतके दान मिळाले आहे. यात 56.7 किलो चांदी आणि 3.75 किलो सोने यांचा समावेश आहे. राजाच्या एकूण दानपेटीच्या रकमेत जरी घट जाणवत असली तरीही यंदा राजाला अर्पण करण्यात आलेली सोन्याचे ताट, दोन वाट्या आणि दोन चमचे हे आतापर्यंतचे सर्वात महागडे असे दान आहे. ह्याची किंमत जवळपास 50 लाख रुपये आहे.

यंदा लालबागच्या राजाला पहिल्या दिवसापासूनचे जास्त किंमतीचे दान अर्पण केले जात होते. त्यात यंदा सोने-चांदीच्या वस्तूंचे दान सर्वाधिक होते. तसेच यंदा लालबागचा राजा साठी चंद्रयान 2 चा देखावा साकारण्यात आल्यामुळे लालबागच्या राजाला एक वेगळाच साज चढला होता. मात्र यंदा गणेश चतुर्थी धो-धो कोसळणा-या पावसाने गणेश भक्तांची घोर निराशा केली. ज्याचा परिणाम स्वरुप दरवर्षीच्या तुलनेत यंदा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची संख्या कमी पाहायला मिळाली.