Ladki Bahin Yojana: गौरी आगमनापूर्वीच खात्यात जमा होणार ऑगस्टचा हप्ता, की मिळणार एकत्र 3000 रुपये?

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गुरुवारी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तील पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Ladki Bahin Yojana: गौरी आगमनापूर्वीच खात्यात जमा होणार ऑगस्टचा हप्ता, की मिळणार एकत्र 3000 रुपये?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin

लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात आगमन झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. आता गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचेही आगमन होणार आहे. सण-उत्सवाच्या याच आनंदाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तील (Ladki Bahin Yojana)  पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे.

गौरी आगमनाच्या मुहूर्तावर वितरण सुरू होण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरी आगमनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वितरण प्रक्रिया १६ किंवा १७ सप्टेंबरपासून सुरू केली जाऊ शकते. यानंतर टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे सांगण्यात येत आहे. शासकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबरपासूनच ऑगस्टच्या हप्त्याच्या निधी वितरणाशी संबंधित प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेला वेग आला होता. मात्र राज्य सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

किती महिलांना मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सरकारने जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केला होता. आता गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या मंगल पर्वावर ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

एकत्र ३००० रुपये मिळण्याचीही शक्यता

जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता २० सप्टेंबरपर्यंत जमा झाला नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे झाल्यास पात्र महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी ३००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र या दोन हप्त्यांबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही.

महिलांचे लक्ष निर्णयाकडे

ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता गौरी आगमनापूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार, की ऑगस्ट-सप्टेंबरचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळणार, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. सणासुदीच्या काळात हा हप्ता एक प्रकारचे गिफ्ट ठरेल का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबतची अंतिम आणि अधिकृत माहिती राज्य सरकारकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2026 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).