Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' ठरली महायुतीसाठी गेमचेंजर; विधानसभा निवडणुकीच्या यशात मोठा वाटा
मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महिलांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचे आकडेदेखील हे सिद्ध करतात.
यंदाच्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024) महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. हे निकाल खचितच धक्कादायक आहेत आणि त्याबाबत महाविकास आघाडीने विचारमंथन करणे गरजेचे आहे. महायुतीच्या या विजयात लाडली बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) मोठा वाटा आहे. या योजनेच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुकीत ही मोठी योजना ठरणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या महायुती पक्षांनी लाडली बहिण योजनेचा जोरदार प्रचार केला. आता आजचे महायुतीचे यश पाहता ही योजना ‘गेमचेंजर’ ठरल्याचे बोलले जात आहे.
याधीच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे 5% मतदान वाढले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महिलांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचे आकडेदेखील हे सिद्ध करतात. भाजप सरकारने ज्याप्रमाणे मध्यप्रदेशात ‘लाडली बहन योजना’ निवडणुकीपूर्वी लागू केली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अवघ्या चार महिने आधी ‘लाडकी बहिण योजना’ सुरू केली.
महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांपासून महिलांना 1,500 रुपये मिळत आहेत, जे शेजारच्या मध्य प्रदेशापेक्षा जास्त आहेत. मध्यप्रदेशात लाडली बहन योजनेअंतर्गत 1250 रुपये मिळतात. ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करणारे अभिलाष खांडेकर म्हणतात, ‘लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचा प्रभाव पडला, हे नाकारता येणार नाही. विदर्भ असो की मराठवाडा, मतदानानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या आणि त्यामध्ये लाडकी बहिण योजनेने प्रेरणादायी शक्ती म्हणून काम केले. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election Results 2024: राज ठाकरेच्या मनसेला जनतेने पुन्हा नाकारले; राज्यात एकही जागी विजय नाही)
ते पुढे म्हणाले, मी अशा योजनांशी सहमत नाही. परंतु आजचे निकाल हे दर्शवतात की, पैसा वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. महाराष्ट्रात शेतीचे अनेक प्रश्न होते, मराठा आंदोलन होते, धारावीचा मुद्दा होता. मात्र महिलांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा परिणाम दिसून येत असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आले. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली’