Kurla Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 19 वर; PM Narendra Modi यांच्याकडून नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

Kurla Building Collapse (संग्रहित संपादित प्रतिमा)

काल रात्री उशिरा मुंबईमध्ये (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरातील नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला व 27 जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीतील रहिवाशांना इमारतीच्या दुरवस्थेबाबत वारंवार इशारा देण्यात आला होता, मात्र त्यांनी तिथेच राहण्याचा आग्रह धरला. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ते म्हणतात, ‘मुंबईत इमारत कोसळल्याची बातमी ऐकून दु:ख झाले. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील, तर जखमींना रु. 50,000 ची मदत केली जाईल.’

शोध आणि बचाव मोहिमेवर देखरेख करण्यासाठी मंगळवारी घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी इमारतीतील रहिवाशांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यामध्ये इमारतीला दुरुस्तीसाठी योग्य म्हणून दर्जा देण्यात आला होता, परंतु दुरुस्ती करण्यात आली नाही.’ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. याशिवाय भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

अपघातानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. जेव्हा बीएमसीने या इमारतीला नोटीस बजावली होती, तेव्हाच ती स्वेच्छेने रिकामी करायला हवी होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अशा मोडकळीस आलेल्या इमारती शोधून त्यांच्यावर कारवाई करू, जेणेकरून भविष्यात कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे  काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात, असे निर्देशही दिले आहेत. (हेही वाचा: स्थानिक आमदार मंगेश कुडाळर यांची गुवाहाटीत 'पंचतारांकीत' मज्जा; नागरिकांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे मध्यरात्रीही सज्ज)

दरम्यान, या महिन्यात महानगरात इमारत कोसळण्याची ही तिसरी मोठी घटना आहे. 23 जून रोजी चेंबूर परिसरात दोन मजली औद्योगिक इमारतीचा भाग कोसळून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. उपनगरातील वांद्रे येथे 9 जून रोजी तीन मजली निवासी इमारत कोसळून एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर 18 जण जखमी झाले होते.