Kopardi Rape And Murder Case: उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

महाराष्ट्रामध्ये कोपर्डी (Kopardi) येथे अवघ्या 15 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता.

मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

Kopardi Rape And Murder Case: महाराष्ट्रामध्ये कोपर्डी (Kopardi) येथे अवघ्या 15 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी सगळ्यांनाच सुन्न करणार्‍या या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील (Umeshchandra Yadav Patil) यांची नियुक्ती करण्यात आल्याचं आज जाहीर केले आहे.

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तीन आरोपी आहेत. या तिन्ही आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाविरूद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यांच्या नावाची चर्चा होती. संबंधित प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला होता त्यानुसार आता खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी उमेशचंद्र यांची निवड पक्की झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला सुन्न करणार्‍या या घटनेचा विविध स्तरातून निषेध करण्यात आला होता. मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करून फाशीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी राज्यभर निषेध नोंदवण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते.