Kolhapur: कोल्हापुरात पकडला 63 अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा ट्रक; मदरशात शिकत असल्याचा दावा, बिहार-बंगालमधून आणले होते महाराष्ट्रात (Watch Video)

ही मुले उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी आपापल्या गावी गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुस्लिम मुलांना घेऊन जाणारा ट्रक (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील कोल्हापुरात (Kolhapur) एका ट्रकमध्ये 63 मुले सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व मुलांना बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरून आणण्यात आले होते. या मुलांचे आधार कार्ड आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. चौकशी आणि तपासात ते जवळच्याच मदरशात (Madrasa) शिकत असल्याचे समोर आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते आपापल्या गावी गेले होते, तेथून ते रेल्वेने रेल्वे स्टेशनवर पोहोचले. यानंतर त्यांना ट्रकमधून नेले जात होते.

या मुलांशी संबंधित मदरसा शोधून काढण्यात आली आहे. त्या मदरशाच्या मौलानाला पोलिसांनी बोलावले आहे. ट्रकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले सापडल्याच्या घटनेबाबत पोलीस चौकशी व तपास सुरू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार त्या मुलांना मदरशात पाठवले जात होते. काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित लोकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्या मुलांची चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांची छाननी केली असता, त्यापैकी बहुतांश पश्चिम बंगाल आणि बिहारमधून आले असल्याचे आढळून आले.

ही सर्व मुले ज्या मदरशात शिकत आहेत, तेथील मौलानाने ही मुले त्याच्याच मदरशातील असल्याचे मान्य केले आहे. ही मुले उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी आपापल्या गावी गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूरचे डेप्युटी एसपी मंगेश चव्हाण यांनीही ही मुले कोल्हापुरातील मदरशात शिकतात आणि उन्हाळी सुट्टी व्यतीत करून मूळ गावावरून परतले असल्याचे स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: Girls Missing In Maharashtra: 'त्या' साऱ्याजणी गेल्या कुठे? महाराष्ट्रातन 594 मुली बेपत्ता, एकट्या पुण्यातील आकडा 447)

परंतु ट्रकमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भरून लहान मुलांना इतक्या लांबून जिल्ह्यातील मदरशात का आणले जात होते? याचा कोणताही सुगावा स्थानिक प्रशासनाला कसा लागला नाही? या मुलांना इथे शिकवण्याचा मदरसाचा काय हेतू होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुलांना अशा प्रकारे नेले असता अपघात होऊ शकतो. तसेच मुलांना श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराची कसून चौकशी होत आहे.