Kolhapur Municipal Election 2021: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेकांचा वाजला राजकीय बँड
अनेकांना या आरक्षणामुळे नवी संधी मिळाली आहे. आरक्षण सोडती जाहीर झाल्यामुळे आता येत्या फेब्रुवारी 2021 मध्ये महापालिका निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2021 (Kolhapur Municipal Election 2021) साठी आरक्षण सोडत जाहीर (Reservation Draw Declared) झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर कोल्हापूरातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. नव्या रणनितीस सुरुवात झाली आहे. आरक्षण पाहताच अनेकांचा राजकीय बँड वाजला आहे तर गोष्टी काहींच्या मनासारख्या झाल्या आहेत. आपल्या हक्काच्या प्रभागात आरक्षण पडल्याने अनेकांची चडफड झाली आहे. काहिंनी दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवता येऊ शकते का? याबाबत चाचपणी सुरु केली आहे तर काहींनी सशर्थ पाठिंबा देण्याच्या गोष्टी सुरु केल्या आहेत. एकूणच काय तर अनेकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीमुळे अडचणीत आलेल्यांमध्ये माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक आणि अनेक इच्छुकांचा समावेश आहे. अनेकांना या आरक्षणामुळे नवी संधी मिळाली आहे. आरक्षण सोडती जाहीर झाल्यामुळे आता येत्या फेब्रुवारी 2021 मध्ये महापालिका निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, Kolhapur Municipal Corporation Election 2020: कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रभागातील आरक्षण बदलाचे संकेत, अनेकांचे धाबे दणानले; 95% फेरबदलाची शक्यता)
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबरमध्येच संपली आहे. परंतू, कोरोना व्हायरस संकटामुळे निवडणूक आयोगाने सर्वच निवडणुकांना स्थगिती दिली. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणूकही स्थगित झाली. त्यामुळे या महापालिकेची निवडणूक आता येत्या फेब्रुवारी किंवा दरम्यानच्या काळात पार पडू शकते. त्यासाठी प्रशासनाने निवडणूक आरक्षण आराखडा प्रभागनिहाय तयार केला. त्यानंतर या आराखड्यानुसार आरक्षणाची सोडत कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली.
दरम्यान, जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर कोणास काही आक्षेप, हरकती असल्यास त्याबाबत येत्या 4 जानेवारी पर्यंत मुदत आहे. सर्व आक्षेप, हकरती आदींचा विचार केल्यानंतर शेवटची आणि अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्यात येईल.