Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2021: गोकुळ दूधसंघ निवडणुकीस हिरवा कंदील, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सत्ताधाऱ्यांची याचिका

कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक वर्षभर लांबली होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे येत्या 2 मे रोजी ही निवडणूक पार पडत आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूधसंघ नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे.

Kolhapur Gokul Dudh Sangh | (File Photo)

कोल्हापूर (Kolhapur) आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेली गोकूळ दूधसंघ निवडणूक 2021 (Gokul Dudh Sangh Election 2021) अखेर पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळून लावल्याने या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग वाढण्याचे कारण पुढे करत ही निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी याचिकेच्या रुपाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. परंतू, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे या निवडणुकीस आता हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूधसंघ निवडणुकीची चर्चा आहे.

गोकुळ दूध उत्पादक संघासाठी निवडणूक कार्यक्रम या आदीच जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक वर्षभर लांबली होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे येत्या 2 मे रोजी ही निवडणूक पार पडत आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूधसंघ नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. कारण, ज्याच्याकडे गोकुळची सत्ता त्याच्याकडे जिल्ह्याची सत्ता असे एक समिकरणच गेली अनेक वर्षे जमले आहे.

गोकुळ दूधसंघ निवडणुकीवर सत्ताधारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात निवडणूक स्थगित करावे असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर 26 एप्रिल पर्यंत आपले म्हणने मांडावे असे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आपली बाजू न्यायालयात मांडली. राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळून लावत निवडणुकीला ग्रीन सिग्नल दिला. या निवडणुकीत मतदानासाठी 36 ऐवजी 70 ठिकाणी मतदान बूथ तयार करावे असेही कोर्टाने म्हटले आहे.  (हेही वाचा, कोल्हापूर: खुर्च्या बांधून ठेवल्या! गोकुळ दूध उत्पादक संघ सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यात)

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशावरुन आता कोल्हापूरात जोरदार राजकारण रंगले आहे. आता सत्ताधारी गटाने थेट निवडणुकीला सामोरे जावे. उगाचच जागतिक कोर्टात जाण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे. तसेच, ही निवडणूक पूर्णपणे नियमांचे आणि कोर्टाच्या आदेशाचे पालन करुनच पार पडेल. गरज पडल्यास शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करु दिलं जाईल, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. 36 ऐवजी 70 ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या कोर्टाच्या सूचना आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल. आता सत्ताधारी गटाने जागतिक कोर्टात जाऊ नये. कोर्टाच्या सूचनांचे पालन करून निवडणूक होईल. पॉझिटिव्ह आलेल्या ठरावधारकांना शेवटच्या तासात पीपीई किट घालून मतदान करु दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.