कोल्हापूरमध्ये वृद्धाश्रमात जमली लव्हस्टोरी; 75 वर्षीय आजोबा 70 वर्षीय आजीसोबत चढले बोहल्यावर; पार पडलं विधिवत लग्न (Watch Video)

त्यासाठी असलेल्या सार्‍या कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचा हा विवाह सोहळा संपन्न पडला आहे.

Kolhapur Wedding | Twitter @imvivekgupta

प्रेमाला वयाचं बंधन नसतं याची प्रचिती देणारा एक खास विवाहसोहळा कोल्हापूरात पार पडला आहे. कोल्हापूर मधील जानकी वृद्धाश्रमातील ही अनोखी लव्हस्टोरी आहे. 75 वर्षीय आजोबा आणि 70 वर्षीय आजी दोघांचीही सारखीच व्यथा होती. पण आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्या हक्काचं कुणीतरी कायम असावं या भावनेतून ते बोहल्यावर चढले आणि रितीरिवाजानुसार पुन्हा त्यांचं लग्न पार पडलं आहे.

जानकी वृद्धाश्रमात असलेले 75 वर्षीय बाबुराव पाटील हे शिरोळचे रहिवासी आहेत तर 70 वर्षीय आजी अनुसया शिंदे पुण्यातील वाघोरी येथील आहे. या दोघांचेही पूर्वाश्रमीचे साथीदार हयात नाहीत. त्यामुळे एकमेकांना साथ देण्यासाठी ते एकत्र आले. त्यांना व्याधी आणि दु:ख देखील सारखीच असल्याने एकमेकांशी जुळवून घेता घेता ते प्रेमात पडले.

जानकी वृद्धाश्रमाच्या मालकाने देखील या आजी आजोबांच्या लव्हस्टोरीला लग्नामध्ये बदलून नात्याला नाव दिलं आहे. त्यासाठी असलेल्या सार्‍या कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचा हा विवाह सोहळा संपन्न पडला आहे.

पहा लग्नाचा क्षण

अनेकदा मुलांना लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने, आजारपणामुळे अंथरूणाला खिळून पडलेल्या अनेक वृद्धांची आयुष्याची संध्याकाळ रडत-कुढत जाते पण या सत्तरी मधील जोडप्याने पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजून एक नवा पायंडा टाकत अनेकांना आपलं आयुष्य 100% आनंदात जगण्याची नवी उर्मी दिली आहे.