Kishori Pednekar Vs Ashish Shelar: खोट्या तक्रारी दाखल करुन घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकारच्या अहंकारासमोर झुकणार नाही; आशिष शेलारांची प्रतिक्रिया
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजपा अशा संघर्ष सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आशिष शेलार यांनी त्यांच्यावर गुन्हा झाल्यानंतर आज पहिली प्रतिक्रिया देताना 'मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केलाय, त्या विरोधात माझी बाजू न्यायालयात मांडेन' असं म्हटलं आहे. सोबतच अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की मग सत्तेचा, पोलीसांचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहत आहे. 'खोटे गुन्हे दाखल करुन जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर मग यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल तर मग तो शंभरवेळा आम्ही करु' असं म्हणत आव्हान दिले आहे. Kishori Pednekar Vs Ashish Shelar: महापौर किशोरी पेडणेकर यांची तक्रार, आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
पहा आशिष शेलारांची प्रतिक्रिया
दरम्यान आज मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये आशिष शेलार यांनी जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावली आहे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. 'जाब विचारला म्हणून आम्हालाच दोषी ठरवलेय. त्याचेही योग्य सनदशीर उत्तर आम्ही देऊच. ठाकरे सरकार सारखे असनदशीर वागणार नाही.' असं म्हणताना त्यांनी सत्य समोर येईलच, सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन! या सगळ्या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना आम्हाला आहे! असं म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे.