Bandatatya Karadkar: बंडातात्या करडकर पोलिसांच्या ताब्यात, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबतचे वक्तव्य भोवण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Kirtankar Bandatatya Karadkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. अनेक महिला नेत्यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या फलटण जिल्ह्यातील पिंपरद येथील मठावरही दाखल झाले. त्यानंतरत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पिंपरद येथील मठातून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना फलटण येथे नेले आहे. आता त्यांच्यावर पुढील कारवाई काय होते याबाबत उत्सुकता आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. दरम्यान, बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्यांविरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Bandatatya Karadkar On Supriya Sule: 'माझं चुकलं', कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन माफी)
सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. या निर्णयावर अनेकांकडून टीका आणि विरोध होतो आहे. दरम्यान, सातारा येथे बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांची जीभ काहीशी घसरली. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी 'सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात', असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच, प्रसारमाध्यमांनी विचारले असता 'होय, त्यांनी आव्हान स्वीकारावे आपण ते सिद्धही करु शकतो' असे म्हणत बंडातात्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थनही केले होते. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) वाईनबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.