Kirit Somaiya on Hasan Mushrif: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांच्याकडून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल उपस्थित करत या कारखान्यात हस मुश्रीफ यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे

Kirit Somaiya | (Photo Credits: Facebook)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर होणआऱ्या ईडी कारवाईच्या भीतीने आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल उपस्थित करत या कारखान्यात हस मुश्रीफ यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्याबाबतचे कागदपत्र आपल्याकडे आहेत. ही कागदपत्रे आपण ईडी आणि आयकर विभागाला देणार आहोत, असेही सोमय्या यांनी सांगितले. आपण काम करत असून लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही उघडकीस आणू, असे सोमय्या यांनी या वेळी सांगितले.

हसन मुश्रीफ यांच्या मुळे आज मला कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेता आले नाही. राज्यातील ठाकरे सरकार हे घोटाळेबाजांना पाठिशी घालते आहे तर जे घोटाळे उघडकीस आणतातत त्यांना अटक करते आहे. पोलिसंनी मला कोणत्या आणि कोणाच्या आदेशानुसार गणेश विसर्जनापासून रोखले. तब्बल 6 तास कोंडून ठेवले याबाबत मला अद्यापही माहिती मिळाली नाही. मी पोलिसांना हात जोडून सांगितले की, मला ऑर्डर दाखवा. पण ते ऑर्डर दाखवू शकले नाहीत. (हेही वाचा, भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले)

पोलिसांनी मला धक्काबुक्की केली, माझ्याशी उद्धटपणे वर्तन केले. याची जबाबादीरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारावी. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिरवा रंग धारण केला असेल. पण त्यांचा हा उद्धटपणा आम्ही चालवून घेणार नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही ठाकरे सरकारची इच्छा आहे काय? असेही सोमय्या म्हणाले.