केईएम हॉस्पिटल मधील 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु
आत्महत्येचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.
मुंबई 17 जून : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे देशभरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे, अशातच आता केईएम इस्पितळातील (KEM Hospital) ओंकार ठाकूर (Omkar Thakur) या 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टरने आज, पहाटे आपल्या राहत्या बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून अद्याप ओंकारच्या आत्महत्येमागील कोणतेही ठोस कारण हाती आलेले नाहीये.
ओंकार ठाकूर हा 21 वर्षीय तरुण दादर मधील कोहिनुर टॉवर्स येथील रहिवाशी आहे,सध्या तो केईएम हॉस्पिटलमध्ये फिसीओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. आज पहाटे तीन वाजता त्याने काहीश्या कारणावरून आपल्या बिल्डिंगच्या छतावर जाऊन तिथून उडी मारली. याबद्दल बिल्डिंग मधील रहिवाश्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्याला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले . मात्र तिथे पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा
दरम्यान काही दिवसांपासून देशात डॉक्टरांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. नायर हॉस्पिटल मधील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येनंर महाराष्ट्रात जातीयवादाच्या मुद्द्याने अक्षरशः पेट घेतला होता. या घटनेच्या चर्चा संपता न संपताच ओंकार ठाकूर याच्या आत्महत्येने आता पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सध्या देशात सुरु असणाऱ्या घटनांचा काही संबंध आहे की ओंकारने वैयक्तिक कारणाने हे पाऊल उचलले याचा पोलीस तपास करत आहेत.