Rahul Gandhi: काँग्रेसच्या बंडखोराला राहुल गांधी यांचा फोन, एक घाव दोन तुकडे; झटक्यात उमेदवारी अर्जच मागे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी केल्यानंतर बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी प्रदेश काँग्रेसची घालमेल वाढवली होती. मात्र राहुल गांधी यांनी त्यावर तोडगा काढला.

Rahul Gandhi | (Photo Credit - File Image))

Kasba Peth Assembly By-Election 2023: काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या एका फोनमुळे महाराष्ट्र काँग्रेस टेन्शन फ्री झाली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी केल्यानंतर बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी प्रदेश काँग्रेसची घालमेल वाढवली होती. बाळासाहेब दाभेकर उमेदवारीसाठी इच्छुक होते. ते काँग्रेसचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते असल्याने त्यांनी उमेदवारीवर दावा ठोकला होता. मात्र, पक्षाने त्यांना डावलून रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले. परिणामी दाभेकरांनी थेट बंडाचे निशाण फडकवले. उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे आता नेमके काय करायचे हा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस आणि प्रदेश नेतृत्वासमोर होता. महाविकासआघाडीतील घटक पक्षांकडून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या अनेक दाव्या-प्रतिदाव्यानंतर काँग्रेसने कसब्याची जागा स्वत:कडे घेतली आहे.

बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसकडे दोनच पर्याय होते. एक म्हणजे दाभेकर यांची मनधरणी करणे किंवा त्यांना पक्षातून थेट निलंबीत करुन हकालपट्टी करणे. पहिल्या पर्याय शक्य होता. दुसरा पर्याय अडचणीचा होता. कारण त्याने पक्षाच्याच उमेदवाराला (रवींद्र धंगेकर) धोका पोहोचला असता. शेवटी राजकारणात नाराजीनाट्य, मानापमान यांना बरेच महत्त्व असते. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने बाळासाहेब दाभेकर यांची समजूनत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. (हेही वाचा, Chinchwad Bypoll 2023: चिंचवडमधून भाजपला टक्कर देण्यासाठी शरद पवार यांनी दिला तगडा उमेदवार, राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना तिकीट)

कसबा पोटनिवडणुकीतील जागा निवडून आणायची तर आगोदर पक्षातील बंडखोरी रोखायला हवी हे काँग्रेस जाणून होती. त्यामुळे काँग्रेसने थेट हायकमांडकडेच गाऱ्हाने घातले. हायकमांडकडे हे प्रकरण जाताच राहुल गांधी यांनी प्राथमिक माहिती घेऊन थेट बाळासाहेब दाभेकर यांनाच संपर्क साधला. स्वत: बाळासाहेब दाभेकर यांनीच याबाबत माहिती दिली. आता थेट पक्षाच्या केंद्रीय आणि सर्वोच्च नेत्याचाच फोन आला म्हटल्यावर बाळासाहेब दाभेकर यांचाही नाईलाज झाला असावा किंवा आपली भूमिका योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. राहुल गांधी यांच्या फोननंतर दाभेकरांची नाराजी दूर झाली. त्यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. शिवाय रविंद्र धंगेकर यांचा प्रचारही करणार असल्याचे म्हटले.

बाळासाहेब दाभेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहोत. पाठिमागील 40 वर्षे आपण पक्षासाठी काम करत आहोत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी आपली इच्छा होती. मात्र,ती मिळाली नाही. त्यामुळे आपण उमेदवारी दाखल केली. परंतू, आता पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्याशीच फोनवर बोलने झाले. आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असून, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारातही सक्रीय असणार आहे, असे बाळासाहेब दाभेकर यांनी सांगितले.