Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी; सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे

यंदा 23 नोव्हेंबर दिवशी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

Amruta Fadnavis and Devendra Fadnavis (Photo Credits: Instagram)

यंदा कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीची पूजा उपमुख्यमंत्र्यांविना करण्याचा निर्णय झाला होता परंतू राज्याची प्रथा अखंडित ठेवायची असं मुख्यमंत्र्यांकडून सांगत काल झालेल्या बैठकीत यंदा विठ्ठल-रूक्मिणीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सकल मराठा समाजाने देखील या शासकीय महापूजेत उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागाला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. पण काल जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा 23 नोव्हेंबर दिवशी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. Tulsi Vivah 2023 Date and Muhurat: तुळशी विवाह मुहूर्त, तारीख आणि महत्त्व, घ्या जाणून .

सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री वेळ देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे.

कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज (22 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता पंढरपूरात येणार आहेत त्यानंतर पहाटे अडीज वाजता पूजा सुरू होणार आहे. या पूजेसाठी सपत्निक सहभागी होण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यांच्यासोबत सामान्य वारकरी कुटुंब देखील पूजेमध्ये सहभागी असतं.