Karnataka-Maharashtra Border Row: कर्नाटकात जाणाऱ्या MSRTC च्या सर्व गाड्यांना स्थगिती, कर्नाटकातील दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय
कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटकमध्ये हिंसक प्रकार घडू शकतात. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. MSRTCही देशातील अव्वल वाहतूक कंपन्यांपैकी एक आहे. एमएसआरटीसीकडे 16,000 हून अधिक बसेस आहेत. देशातील सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक अशी ही संस्था आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात असलेल्या सीमावादावरुन कर्नाटकमध्ये आंदोलने सुरु आहेत. पाठिमागील दोन दिवसांपासून कर्नाटकमध्ये या आंदोलनास हिंसक वळण मिळाले आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातील महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटक हद्दीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एमएसआरटीसी बस आणि त्याद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन ही बससेवा काही काळ स्थगित करण्यात आल्याचे चन्ने म्हणाले. (हेही वाचा, Sharad Pawar On Basavaraj Bommai: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक- शरद पवार)
चन्ने यांनी पुढे बोलताना सांगितले की, मंगळवारी दुपारपासून ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर परिवहन महामंडळाने मंगळवारी दुपारपासून बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बससेवा कोणत्या कालावधीत किती काळ बंद राहतील याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.
ट्विट
दरम्यान, सीमावादाच्या मुद्द्यावरुन कर्नाटकातील काही समाजकंटक आणि कन्नड रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कर्नाटक हद्दीत असलेल्या महाराष्ट्राच्या वाहनांवर कथीतरित्या दगडफेक केली. या दगडफेकीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. ही घटना प्रामुख्याने बेळगाव जवळ असलेल्या हिरेबागवाडी (Hirebaugwadi) परिसरात घडली.