Section 144 in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढचे 15 दिवस जमावबंदी आदेश लागू; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक तीव्र
पाठिमागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोल्हापूरात सीमावादाचे पडसाद अधिक उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदी आदेश (Section 144 in Kolhapur) जारी केले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) आता अधिक तीव्र झाला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोल्हापूरात (Kolhapur) सीमावादाचे पडसाद अधिक उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदी आदेश (Section 144 in Kolhapur) जारी केले आहेत. दंडाधिकाऱ्यांनी जारी केल्या आदेशानुसार, कोल्हापूरमध्ये पुढचे 15 दिवस जमावबंदी असेल. पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यावर बंदी असेल. कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम, सभा, मेळावे आदिंचे आयोजन करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत. तसेच, सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून म्हणजेच 9 ते 23 डिसेंबर या कालात जमावबंदी आदेश लागू राहील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू असणार आहेत. (हेही वाचा, Maharashtra-Karnataka Border Row: मुंबईतील पवई परिसरात कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली निदर्शने)
सीमावादाच्या मुद्द्यावर महाविकासआघाडीमधील नेत्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह इतरही समविचारी नेते उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार करण्यात येणारी अवमानकारक वक्तवे याच्या निषेधार्थ उद्या म्हणजेच 10 डिसेंबर (शनिवार) रोजी कोल्हापूर येथील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभमीवर जिल्हा प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून जमावबंदी आदेश लागू केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली होती. त्यांना आजची वेळ मिळाली असून हे खासदार पंतप्रधानांना आज भेटणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपालांची वक्तवे आणि भाजप नेत्यांकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमना या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पंतप्रधान दोन्ही राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार असल्याचे समजते.