Kalyan Suicide Case: कल्याण मध्ये 13 वर्षीय मुलाने आत्महत्या करत जीवन संपवलं; सुसाईड नोट मध्ये शिक्षिका, वर्ग मित्राने चिडवल्याचा उल्लेख
कमी मार्क्स मिळाल्याने शिक्षिका आणि वर्गमित्राकडून थट्टा मस्करी झाल्याने आठवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याण (Kalyan) मध्ये 13 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याचं समोर आलं आहे. विघ्नेश पात्रो असं या मुलाचं नाव असून तो कल्याण पूर्व येथील आयडियल शाळेमध्ये आठवी मध्ये शिकत होता. त्याने लिहलेल्या चिठ्ठीमध्ये शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केल आहेत. सध्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या आत्महत्येचा तपास सुरू आहे.
विघ्नेश पात्रो चिकणीपाडा मध्ये राहत होता. रविवारी त्याचे वडील प्रमोदकुमार कामाला गेले होते. आत्महत्या केलेल्या मुलाची आई आणि बहीण देखील बाहेर गेली होती तेव्हा त्याने घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह दिसला. MBA Student Dies By Suicide: मालाडमध्ये 22 वर्षीय एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या; शैक्षणिक दबावामुळे सातव्या मजल्यावरून मारली उडी.
विघ्नेशचे वडील नवी मुंबई मधून कामावरून परत आले तेव्हा घराचा दरवाजा आतमधून बंद होता. अनेकदा हाक देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने घराची खिडकी उघडण्यात आली तेव्हा मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी टाहो फोडला. विघ्नेशला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले पण तो पर्यंत उशिर झाला होता. रूक्मिणी हॉस्पिटल मध्ये सध्या विघ्नेशचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.
विघ्नेशच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये एका शिक्षिका आणि मुलाचा उल्लेख आहे. त्यांनी चिडवल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या शिक्षिकेला शाळेने निलंबित केले आहे. वडिलांच्या तक्रारीवरून आधी पोलिसांनी अकस्मात निधनाची नोंद केली होती परंतू नंतर सुसाईड नोट सापडली. त्यामधील मजकूरानुसार शाळेत कमी मार्क्स मिळाल्याने शिक्षिका आणि वर्गमित्राकडून विघ्नेनशी थट्टा मस्करी करण्यात आली. त्यामधूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. विघ्नेशने कुटुंबासाठी देखील भावनिक मेसेज लिहला होता.