कल्याण-डोंबिवली मधील 15 रुग्णालयांनी उकळली रुग्णांकडून अतिरिक्त बिल, महापालिकेने दणका देत 51 टक्के रक्कम केली परत
यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेने या खासगी रुग्णालयांना दणका देत नागरिकांकडून उकळण्यात आलेली बिलाची 51 टक्के रक्कम त्यांना परत करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या संकट काळात सामान्य नागरिकांची खासगी रुग्णालयांकडून लूटमार करण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांसाठी उपचार करण्यासंदर्भातील रक्कम सरकार कडून ठरवण्यात आली असली तरीही खासगी रुग्णालय ऐकत नसल्याचे सध्या दिसून येत आहेत. याच दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील जवळजवळ 15 रुग्णालयांनी नागरिकांकडून अतिरिक्त बिल उकळल्याचा प्रकार समोर आला. यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेने या खासगी रुग्णालयांना दणका देत नागरिकांकडून उकळण्यात आलेली बिलाची 51 टक्के रक्कम त्यांना परत करण्यात आली आहे. ही रक्कम रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस धाडल्यानंतर जमा केली आहे.
नागरिकांनी बिलाची अतिरिक्त रक्कम खासगी रुग्णालयांकडून घेतली जात असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे महापालाकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कोरोनाच्या रुग्णालयामध्ये ऑडिट करण्याचे आदेश दिले. या ऑडिट नंतर असे समोर आले की, जवळजवळ 15 रुग्णालयांनी रुग्णांकडून तब्बल 31.45 लाख रुपयांच्या अतिरिक्त बिलाची रक्कम वसूल केली आहे. यामधील 16.15 लाख ही रक्कम नागरी अधिकाऱ्यांनी रुग्णांना परत केली आहे. याच सोबत रुग्णालयांनी जर उपचारासाठी आणि आरक्षित बेड्ससह नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच येईल असा इशारा सुद्धा महापालिकेने दिला आहे.(Coronavirus: महाराष्ट्र पोलिस दलात 264 पोलिसांना कोरोनाची लागण, पाहा एकूण आकडेवारी)
दरम्यान, ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवली येथे सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्याासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या अधिक प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आल्याने कोविड19 च्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश महापालिकेने दिले होते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी वन रुपी क्लिनिकमध्ये कोरोनाची मोफत चाचणी करण्यात येणार असल्याचे ही म्हटले होते.