Jalna Water Issue: जालना जिल्ह्यातील प्रकल्पात 10 टक्के पाणीसाठा शिल्लक; ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट

त्यातील तब्बल 41 प्रकल्पांची पाणी पातळी मृतसाठ्यात गेली आहे. 18 प्रकल्पांत 25 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशीरा झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. जालना (Jalna) जिल्ह्यात देखील जून महिना कोरडा गेला असून, अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सुद्धा केवळ 10 टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. जिल्ह्यातील 23 प्रकल्पात दहा टक्के, तर 41 प्रकल्पांत मृतसाठा असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वेळेवर पाऊस झाला नाही तर हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात दमदार पाऊस पडेपर्यंत जालनाकरांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. (हेही वाचा - Weather Forecast Maharashtra: आज पाऊस पडेल का? जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान)

जालना जिल्ह्यात एकूण 64 मध्यम, लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल 41 प्रकल्पांची पाणी पातळी मृतसाठ्यात गेली आहे. 18 प्रकल्पांत 25 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 5 प्रकल्पांत 26 ते 50 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण 10.96 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यात दमदार पावसाची गरज आहे. अन्यथा जालनाकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जालना जिल्ह्यात आजवर किमान 186.28 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. गतवर्षी याच कालावधीत 254.36 मिमी म्हणजे 31 टक्के पाऊस झाला होता. परंतु, यंदा 124.06 म्हणजे 20.66 टक्केच पाऊस झाला आहे. दरम्यान अपेक्षित पाऊस न झाल्याने याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांवर होणार आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर समोर उभा राहू शकतो.