श्रीनगर मधील दहशतवादी हल्ल्यात जळगावच्या यश देशमुख ला वीरमरण; 28 नोव्हेंबर रोजी पार्थिव चाळीसगावला आणणार

त्यात दोन जवान शहीद झाले असून त्यापैकी एक जवान महाराष्ट्राचा वीरपूत्र आहे. यश देशमुख असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता.

Yash Deshmukh | Photo Credits: Facebook

जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील श्रीनगर (Srinagar) जवळील एचएमटी भागांत जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यात दोन जवान शहीद झाले असून त्यापैकी एक जवान महाराष्ट्राचा वीरपूत्र आहे. यश देशमुख (Yash Deshmukh) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील पिंपळगावचा तो रहिवासी होता. 28 नोव्हेंबर रोजी त्याचे पार्थिव चाळीसगाव येथे आणण्यात येणार आहे. यशच्या शहीद होण्याने कुटुंबासह संपूर्ण गावांवर शोककळा पसरली आहे.

यश गेल्या वर्षी पॅरा मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याची नेमणूक काश्मीरमध्ये करण्यात आली आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीरमरण आले. ही बातमी सैन्य दलाने फोनद्वारे कुटुंबियांना कळवली. यश देशमुख याचं पार्थिव शवविच्छेदनानंतर श्रीनगरहुन चंदीगड आणि औरंगाबाद मार्गे चाळीसगावला आणण्यात येणार आहे.

यश याचे वडील शेतकरी असून त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. दोनच दिवसांपूर्वी यशने कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. ते त्याचे कुटुंबियांशी अखेरचे बोलणे ठरले. (शहीद संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापरमध्ये दाखल, निगवे गावात होणार अंत्यसंस्कार)

काल श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले, त्यांनंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. दरम्यान, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.