जळगाव: माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती
10 दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर दुपारी 1 वाजनेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी खासदार हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. प्रदीर्घ काळ त्यांनी राज्याच्या आणि संसदीय राजकारणात स्वत:ला वाहून घेतले. सध्या ते जळगाव (Jalgaon) भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर राजकारणातील एक उमदं व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
हरीभाऊ जावळे यांनी सुरुवातीला रावेर मतदारसंघातूनआमदार म्हणून विधिमंडळावर आणि पुढे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. वय वाढले असूनही हरिभाऊ यांचा उत्साह कायम होता. लोकसंपर्क आणि विकास यासाठी ते सतत कार्यरत असत. दरम्यान, मतदारसंघात कार्यरत असतानाच त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोना व्हायरस संसर्गाने निधन झाल्याबाबतचे वृत्त लोकमत डॉट कॉमने दिले आहे.(हेही वाचा, मुंबई: ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन; मराठी पत्रकारितेचा खांब कोसळल्याची भावना)
ट्विट
कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथे आणण्यात आले. 10 दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर दुपारी 1 वाजनेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ट्विट
जावळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच जळगाव जिल्ह्यात सशोककळा पसरली. भाजपचे ते नेते होते. मात्र, इतर पक्षांमध्येही त्यांचे स्नेहाचे संबंध होते. भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सध्या त्यांच्याकडे जळगाव भाजपची जबाबदारी होती. ते जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष होते. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.