Jalgaon Lok Sabha Constituency: नाराज भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना (UBT) च्या वाटेवर, कमळ सोडून मशाल हाती घेण्याची शक्यता
नुकतीच त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान आले आले. राजकीय वर्तुळातही उन्मेश पाटील हे कमळ सोडून मशाल हाती धरणार असल्याचे बोलले जात आहे.
Jalgaon Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. गल्ली ते दिल्ली राजकारणाचीच चर्चा आहे. दरम्यान, राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहे. राजकीय पक्षांकडून जसजशी उमेदवारी जाहीर होते आहे तसतशी पक्षांतर्गत नाराजीही उफाळून येत आहे. कडेकोट पक्षशिस्त आणि पक्षादेश पाळल्या जाणाऱ्या सत्ताधारी भाजप मध्येही ही नाराजी पाहायला मिळत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon Lok Sabha Constituency) विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) हे देखील नाराज असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान आले आले. राजकीय वर्तुळातही उन्मेश पाटील हे कमळ सोडून मशाल हाती धरणार असल्याचे बोलले जात आहे. उमेदवार यादी जाहीर करताना भाजपने पाटील यांना उमेदवारी नाकारली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना लोकप्रीय चेहरा, निवडून येण्याची क्षमता, जनमानसातील स्थान अशा विविध निकषांचा विचार केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष नाराजी आणि विरोधाभास याला सामोरा जातो आहे. अशा वेळी इनकमिंग आणि आऊटगोईंग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. विरोधकांमध्ये नाराज असलेले सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडे नाराज असलेले विरोधकांडे जात आहेत. देशभरामध्ये अशिच स्थिती आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. (हेही वाचा, Uddhav Thackeray Press Conference Delhi: भाजप भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे, सर्व ठग भाजपमध्ये; उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथे घणाघात)
सुरुवातीच्या काळात काँग्रेसमधील अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दोन शकलं झाली. तरीही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने लढते आहे. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये आयारामांची संख्या जास्त असल्याने विद्यमानांना उमेदवारी डावलल्याचेही पाहाला मिळत आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज विरोधी पक्षाच्या वाटेवर असल्याचे समजते. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्याबाबतही असेच बोलले जात आहे. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) Candidate List: शिवसेना (UBT) उमेदवारांची यादी जाहीर, अनिल देसाई, अरविंद सावंत, यांच्यासह प्रमुख चेहरे मैदानात; कट्टर नेत्यांना संधी)
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना उन्मेश पाटील म्हणाले, संजय राऊत हे माझे मित्र आहेत. संसदेमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे. मैत्री ही राजकारणापीकडे जपावी लागते असे उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव येथून उन्मेश पाटील हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली असून त्या ठिकाणी स्मीता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील हे पुन्हा एकदा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीकडेही या ठिकाणी तगडा उमेदवार नाही. एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी उमेदवारी नाकारली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांची भाजप वापसी होणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात नेमके काय घडते याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत का? त्यावर संजय राऊत म्हणाले, भाजपावर त्यांची नाराजी असेल, त्यांनी केवळ आमच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते पक्षात प्रवेश करणार आहेत की नाही याबाबत माझ्याकडे माहिती नाही.