Jalgaon: प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालयांमध्ये बाळांची अदलाबदल; आता DNA चाचणीद्वारे पटवली जाणार पालकांची ओळख
प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिकांकडून झालेली ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात गोंधळ उडाला.
रुग्णालयांमध्ये बाळांची अदलाबदली झाल्याचे प्रकार आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील. नुकत्याच आलेल्या कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' चित्रपटातही असाच प्रसंग दाखवण्यात आला होता. मात्र आता महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon) येथे ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन बाळांची अदलाबदल झाली आहे. त्यानंतर आता पालकांचे शंका निरसन करण्यासाठी रुग्णालयाने नवजात बालकांची डीएनए चाचणी (DNA Test) करण्याचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले की, डीएनए चाचणी किट आधीच आली आहे आणि आवश्यक नमुने गोळा करून ते विश्लेषणासाठी पाठवले जातील. आठवड्याभरात अहवाल येण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, 2 मे रोजी भुसावळ येथील 20 वर्षीय सुवर्णा सोनवणे आणि पाचोरा येथील 20 वर्षीय प्रतिभा भिल या दोन महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. दोन्ही महिलांची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी दोन्ही प्रकरणांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. काही मिनिटांत दोघींची एकामागून एक प्रसूती झाली. एका महिलेने मुलाला जन्म दिला, तर दुसऱ्या महिलेने मुलीला जन्म दिला.
मात्र, त्यानंतर नवजात शिशू पालकांकडे सोपविताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे बाळांची अदलाबदल झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिकांकडून झालेली ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात गोंधळ उडाला. या चुकीनंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नवजात शिशूंना ताब्यात घेत त्यांना नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल केले. (हेही वाचा: महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये सुमारे 2,200 मुली बेपत्ता; नोकरी, लग्न, प्रेमाचे आमिष दाखवून होत आहे मुलींची दिशाभूल)
या दोन्ही बाळांचे खरे पालक शोधण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या मातांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, शिशुंची आदलाबदल झाल्याची एका पालकाची तक्रार त्यांच्याकडे आली आहे. त्या अनुषंगाने रुग्णालयाची पत्रव्यवहार करून बाळांची डीएनए चाचणी करून घेतली जाणार आहे.