Jalgaon Ambulance Blast: जळगाव मध्ये धावती रूग्णवाहिका पेटली; चालकाच्या सतर्कतेने ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोटापूर्वी गर्भवती महिलेची सुखरूप सुटका (Watch Video)

गर्भवती महिलेला एरंडोल शासकीय रुग्णालय मधून जळगाव जिल्हा रुग्णालय मध्ये नेत असताना हा भयंकर स्फोटाचा प्रकार घडला.

Ambulance Blast | X

जळगाव (Jalgaon) मध्ये धावत्या रूग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा (Oxygen Cylinder Blast) स्फोट झाल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. ही घटना नॅशनल हायवे वरील गुजरात पेट्रोल पंपाजवळील आहे. या स्फोटामध्ये संपूर्ण रूग्णवाहिका जळून खाक झाली आहे पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोट इतका भीषण होता की जवळच असलेल्या एटीएम आणि काही घरांच्या काचा फूटल्या आहेत.

रूग्णवाहिकेला आग लागल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला. त्याच्यासोबत असलेल्या गर्भवती महिला आणि कुटुंबाला देखील बाजूला केले. त्याच्या या प्रसंगावधानतेमुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातामुळे काही काळ आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तातडीने अग्निशमक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तर या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली होती.

पहा रूग्णवाहिकेच्या स्फोटाचा व्हिडिओ

घटनेची माहिती मिळताच गुलाबराव पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती घेतली. गर्भवती महिलेला एरंडोल शासकीय रुग्णालय मधून जळगाव जिल्हा रुग्णालय मध्ये नेत असताना हा भयंकर स्फोटाचा प्रकार घडला.