Coronavirus: कोरोना व्हायरसशी लढताना हेड कॉन्स्टेबल जगदीश पांडुरंग पोटे यांचे निधन; मुंबई पोलिसांनी व्यक्त केले दुःख
डॉक्टर्स, पोलीस, इतर कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. मात्र कधी कधी दुर्दैवाने या लढाईमध्ये अशा काही महत्वाच्या लोकांना मुकावे लागत आहे.
कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढताना सरकार समवेत अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत. डॉक्टर्स, पोलीस, इतर कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. मात्र कधी कधी दुर्दैवाने या लढाईमध्ये अशा काही महत्वाच्या लोकांना मुकावे लागत आहे. कोरोना व्हायरसशी लढताना आता मालवणी पोलीस स्टेशन (Malvani Police Station) चे हेड कॉन्स्टेबल जगदीश पांडुरंग पोटे (Jagdish Pandurang Pote) यांचे निधन झाले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये, ‘त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील.’ असे म्हटले आहे.
एएनआय ट्वीट -
कोरोना व्हायरसचा उद्रेक आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांनी सामाजिक अंतर पाळावे व जास्तीत जास्त शक्यतो घरी रहावे असे आवाहन केले गेले आहे. मात्र या साथीच्या सुरुवातीपासूनच पोलीस असो की डॉक्टर हे लोक नेहमीच फ्रंटलाईनवर लढत आले आहेत. आज, गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक पोलिस अधिकारी या प्राणघातक विषाणूपासून मुक्त झाले असले तरी, दुर्दैवाने जगदीश पांडुरंग पोटे यांचे निधन झाले. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिल्यावर, सोशल मिडियावर अनेकांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस एक करुन जनतेची सेवा करत आहे. कोरोनासह त्यांचे मोठे युद्ध सुरु असून हे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कोविड योद्धांनाही कोरोनाची लागण होत आहे. 26 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र पोलिसांमध्ये एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या 1889 व मृत्यूंची संख्या 20 झाली आहे. यातील 838 पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. (हेही वाचा: मुंबई मध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1438 रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 35,273 वर)
महाराष्ट्रातील आजच्या कोरोना विषाणू स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, राज्यात आज कोरोनाच्या 2598 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात 38, 939 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 698 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत 18, 616 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 59, 546 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.