कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील सर्व रेस्टॉरंट्स, बार 20 मार्च पर्यंत बंद राहणार
'पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन'ने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील सर्व रेस्टॉरंट्स, बार 20 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. 'पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन'ने (Pune Restaurant and Hoteliers Association) यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरातील सर्व रेस्टॉरंट्स आणि बार बुधवारपासून 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात कोणालाही रेस्तराँमध्ये जाऊन पदार्थ खाता येणार नाही, असे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
याशिवाय पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे. याबाबत पुण्यातील व्यापारी महासंघाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, किराणा, दूध, भाजीपाला, मेडीकल दुकानं वगळून व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. यादरम्यान, किराणा, भाजीपाला, दूध आणि मेडिकलची दुकानं सुरु असणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु, गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून विशेष सुचना दिल्या जात आहेत. (हेही वाचा - Coronavirus: पुण्यात कोरोना व्हायरसचा कहर; शाळा, महाविद्यालय सिनेमागृहानंतर आजपासून 3 दिवस ज्वेलर्सची दुकानेही राहणार बंद!)
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, जलरतण तलाव, मॉल्स, चित्रपटगृह तसेच ज्वेलर्सचे सर्व दुकानं पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात सराफ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फक्तेचंद रांका यांनी प्रसार माध्यामांना माहिती दिली आहे. पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात साथरोग नियंत्रण कायद्याांतर्गत नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, प्रशासनाने शाळा, महाविद्याालये, अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने, अभ्यासिका, शिकवण्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न पाळण्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याबाब पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली होती. तसेच पुण्यात कोठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नसल्याचेदेखील किशोर राम यांनी सोमवारी सांगितलं होतं.