Irshalwadi Landslide: इरशाळवाडी दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मिळणार आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची घोषणा
दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे.
मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी (Irshalwadi) येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत 57 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील म्हणाले की, संबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. (हेही वाचा: Night Study Classroom: बीएमसीच्या शाळांमध्ये सुरु होणार 350 रात्र अभ्यासिका; सुमारे 4 लाख विद्यार्थ्यांना लाभ, Mangal Prabhat Lodha यांची माहिती)
दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.