सिंचन घोटाळा: चौकशीत सहकार्य करणार; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
या अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमांध्यमांच्या प्रतिनिधिंनी पवार यांना सिंचन घोटाळा आणि दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्रश्न विचारले.
Irrigation Scam -Ajit Pawar's first reaction: आपण चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे होणाऱ्या चौकशीत आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे मंगळवारी केला. त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलत होते. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या विषयावर मी फार बोलू इच्छित नाही असेही अजीत पवार या वेळी म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. या अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमांध्यमांच्या प्रतिनिधिंनी पवार यांना सिंचन घोटाळा आणि दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्रश्न विचारले. उत्तरादाखल बोलताना अजित पवार म्हणाले, न्यायव्यवस्था ही सर्वांसाठी सारखेच काम करते. कायदे-नियम सर्वांसाठी सारखेच असतात. त्यामुळे होणाऱ्या चौकशीला आपण तयार आहोत. या आधीही झालेल्या चौकशीत मी सहकार्य केले आहे. यापुढेही करत राहणार आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.. त्यामुळे माझ्या वक्तव्याने तपासात कोणतीही बाधा येऊ नये, असे माझ्या वकिलाने बजावले आहे. त्यामुळे यावर मी जास्त बोलणार नाही, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, मराठा आरक्षण: विधानसभेत विधेयक दाखल होण्याची शक्यता)
राज्यात आघाडी सरकार असतानाच सिंचन घोटाळा उघडकीस आला. सन 2004 ते 2008 या काळात सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो. या घोटाळ्याची चौकशी करणार असे अश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने डिसेंबर 2014 पासून या घोटाळ्याची चौकशी सुरु केली. ही चौकशी खुल्या प्रकारची होती. या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून इतक्या स्पष्टपणे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.