तेजस एक्सप्रेस मध्ये शिळं अन्न दिल्याच्या प्रवाशाच्या तक्रारीवरुन कंत्राटदाराला बसला 1 लाखाचा दंड

तेजस एक्सप्रेसमध्ये शिळं अन्न मिळाल्याने रेल्वे प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली.

Tejas Express (Photo Credits: Instagram)

उत्तमोत्तम सुविधा असलेली सुपरफास्ट एक्सप्रेस सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ही सुविधा असलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये (Tejas Express) शिळं अन्न मिळाल्याने रेल्वे प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. याचा भुर्दंड स्वरुप अन्न पुरविणा-या कंत्राटदाराला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाळी तेजस एक्सप्रेसमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. ही सलग दुस-यांदा अशी घटना घडल्यामुळे तेजस एक्सप्रेस मध्ये दिल्या जाणा-या अन्नाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र प्रशासनाने केलेल्या कारवाईने असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे सांगण्यात येत आहे.

HT ने दिलेल्या बातमीनुसार, 11 जानेवारी 2020 तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या एका रेल्वे प्रवाशाने चिपळूण स्थानक गेल्यानंतर जेवण देण्यात आले. मात्र हे जेवण शिळं असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले. त्यावर तेथील केटरिंग च्या माणसांनी ते अन्न बदलून देण्याचे सांगितले. मात्र त्या प्रवाशाला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्याने रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली.

हेदेखील वाचा- तेजस एक्स्प्रेस मध्ये आता पुरविले जाणार खवय्यांच्या जिभेचे चोचले; रेल्वेत मिळणार बिर्याणी, कढी, कोथिंबीर वडी अनेक लज्जतदार पदार्थ

तसेच आपली तब्येत खराब झाली मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यात आले नाही असा दावाही प्रवाशाने केला आहे. आपले जेवण आल्यानंतर त्यातील पुलाव आणि चपात्यांना वास येऊ लागला असंही त्या प्रवाशाने सांगितले.

इतकचं नव्हे तर त्या रेल्वेमधील इतर 8 जणांना हे अन्न खाल्ल्याने उलट्या होऊ लागल्याचे निदर्शनास आले. IRCTC ने याची दखल घेत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करत त्यावर 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. इतकच नव्हे तर प्रवाशांना उलट्या झाल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही असे IRCTC चे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.