Iqbal Singh Chahal यांची गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती
चहल यांच्यापूर्वी गृह सचिवाची जबाबदारी सुजाता सौनिक यांच्याकडे होती.
महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमध्ये बदलापूर (Badlapur) येथील आदर्श विद्या मंदिर (Adarsha Vidya Mandir) शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची (Sexual Assault) घटना सुन्न करणारी आहे. या घटनेनंतर बदलापूर मध्ये जनक्षोभ उसळला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असताना आता सरकारने गृह खात्याच्या इक्बाल सिंह चहल ( I S Chahal) यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांच्या अप्पर सचिव पदी होते. मात्र बदलापूर घटनेनंतर आता त्यांची तातडीने बदली झाली आहे. पोलिस खात्याच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी गृहसचिवांवर असते.
मुंबई उच्च न्यायालयाने सू मोटो द्वारा बदलापूर अत्याचाराची दखल घेतली आहे. कोर्टात काल (22 ऑगस्ट) झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलिस आणि सरकार वर ताशेरे ओढले आहेत. शाळा सुरक्षित नसतील तर राईट टू एज्युकेशनचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आहे. Women Safety in Maharashtra: महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार ॲक्शन मोडवर; विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, घ्या जाणून .
महिला अत्याचाराच्या घटना राज्यात सर्वत्र वाढत असल्याने गृह खात्यावर विरोधक टीका करत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात चहल यांची नियुक्ती झाली आहे. इक्बाल सिंह चहल यांनी कोरोना संकट काळात मुंबई मधील स्थिती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळली होती. प्रतिकुल स्थितीमध्ये त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे अनेकांना जीवनदान मिळाले होते त्यामुळे आता पुन्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
इक्बाल सिंह चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चहल यांच्यापूर्वी गृह सचिवाची जबाबदारी सुजाता सौनिक यांच्याकडे होती, मात्र त्यांची 30 जून रोजी मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीनंतर, सौनिक यांनी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून गृह विभाग आणि प्रशासकीय सुधारणांवर देखरेख ठेवली.