खासदार संजय राऊत यांचा राजीनामा घ्या, ठाण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

डब्ल्युएचओला काय कळते' वैगेरे वैगेरे अशी वक्तव्ये केली होती. राऊत यांच्या वक्तव्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इंडियन मेडिकल असोशिएशन (Indian Medical Association) ठाणे (Thane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस संकट काळात सर्व डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता योद्धा बणून काम करत आहेत. असे असताना 'डॉक्टरपेक्षाही कंपाउंडरला अधिक कळते' असे विधान राऊत यांनी केले आहे. ज्येष्ठ राजकारणी संजय राऊत यांच्या विधानाशी आम्ही असमहमत आहोत. संजय राऊत यांचा आपण तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस संकट काळात डॉक्टर्स एखाद्या योध्याप्रमाणे काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांच्या जीवाला धोका आहे. हा धोका केवळ त्यांनाच नव्हे तर, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या घरातील इतर सदस्यांनाही आहे. जसे की पत्नी, मुले, आई वडील यांनाही संसर्गाचा धोका आहे. असे असताना संजय राऊत यांनी केलेले विधान हे अत्यंत संतापजनक आहे. डॉक्टरांच्या मनौधैर्यावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, असे इंडियन मेडिकल असोशिएशन ठाणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. (हेही वाचा, डॉक्टरांबाबतच्या ‘त्या’ व्यक्त्यव्यामुळे खासदार संजय राऊत अडचणीत; महाराष्ट्र IMA ने केली माफीची मागणी )

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी 'डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळते. डब्ल्युएचओला काय कळते' वैगेरे वैगेरे अशी वक्तव्ये केली होती. राऊत यांच्या वक्तव्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, आपण डॉक्टर्सचा कोणत्याही प्रकारे अपमान, अवमान केला नाही. माझ्या बोलण्यातील खोच आणि कोटी ध्यानात घ्यावी. राजकारणात कोट्या केल्या जातात. त्याकडे तशाच खेळकरपणे पाहायला हवे. मी हे विधान केले तेव्हा माझ्या मनात डॉक्टरांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या मनातही असे कधी येत नाही. मात्र, विशिष्ट राजकीय पक्ष अथवा संघटनांशी जोडलेल्या डॉक्टर अथवा त्यांच्या संघटना उगाचच आक्रमक झाल्या आहेत. मी चुकीचे बोललोच नाही तर माफी अथवा दिलगीरी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर मला माफी मागायला सांगायचे असेल तर पंतप्रधान मोदी यांनी विदेशात जाऊन डॉक्टर्सचा अवमान केला होता. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करणार का? असा टोलाही राऊत यांनी आपल्या स्पष्टीकरणात लगावला आहे.