जळगाव ची GI Certified केळी दुबईला निर्यात; 2020-21 मध्ये भारताकडून 619 कोटी रुपयांच्या 1.91 लाख टन फळ निर्यात
जीआय प्रमाणित बावीस मेट्रिक टन जळगाव केळी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा भाग असलेल्या तांदळवाडी गावच्या प्रगतिशील शेतकर्यांकडून घेण्यात आली.
भौगोलिक सांकेतांक (Geographical Indications) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देत तंतुमय पदार्थ आणि खनिजानी समृद्ध ‘जळगाव इथली जीआय प्रमाणित केळी’ (Jalgaon Banana) ची खेप दुबईला निर्यात करण्यात आली आहे. जीआय प्रमाणित बावीस मेट्रिक टन जळगाव केळी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा भाग असलेल्या तांदळवाडी गावच्या (Tandalwadi Village) प्रगतिशील शेतकर्यांकडून घेण्यात आली.
2016 मध्ये, जळगाव केळीला जीआय प्रमाणीकरण मिळाले ज्याची निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके) जळगाव येथे नोंदणी झाली. जागतिक दर्जाच्या कृषी पद्धतींचा अवलंब केल्यामुळे भारताची केळी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नक्की वाचा: कोकणचा राजा हापूस आंब्यांवर भौगोलिक मानांकनाची मोहर.
भारताच्या केळीची निर्यात 2018-19 मधील 413 कोटी रुपये मूल्य असलेल्या 1.34 लाख मेट्रिक टन वरून वाढून 2019-20 मध्ये 660 कोटी रुपये मूल्य आणि 1.95 लाख मेट्रिक टन पर्यंत वाढली आहे. 2020-21 (एप्रिल-फेब्रुवारी) दरम्यान भारताने 1.91 लाख टन केळी निर्यात केली असून त्याचे मूल्य 619 कोटी रुपये आहे.
केळीच्या उत्पादनात जगात भारत आघाडीवर असून एकूण उत्पादनात भारताचा सुमारे 25% वाटा आहे. केळीच्या उत्पादनात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश यांचा 70% पेक्षा अधिक वाटा आहे.
पायाभूत सुविधा विकास, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठ विकास यासारख्या योजनांच्या विविध घटकांतर्गत निर्यातदारांना सहाय्य पुरवून एपीईडीए (APEDA ) कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, एपीईडीए आंतरराष्ट्रीय ग्राहक- विक्रेता बैठक, कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातदार देशांबरोबर आभासी व्यापार मेळावे देखील आयोजित करते.
या व्यतिरिक्त वाणिज्य विभाग निर्यात योजनेसाठी व्यापार सुविधा , बाजारपेठ प्रवेश इत्यादीसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून निर्यातीला मदत करत आहे.