INDIA Alliance: इंडिया आघाडीची पुढची बैठक होणार की नाही? संजय राऊत यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
यापुढे इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना पूर्णविराम लागणार आहे. यापुढे फक्त समन्वय समितीच्या बैठका होतील.
विरोधकांनी राष्ट्रीय पातळीव उभारलेल्या इंडिया आघाडी (I.N.D.I.A Alliance) च्या तीन बैठका आतापर्यंत पार पडल्या. शेवटची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर पुढची बैठक कोठे होणार याबाबत सर्वांनाच उत्सकता होती. दरम्यानच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. यापुढे इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना पूर्णविराम लागणार आहे. यापुढे फक्त समन्वय समितीच्या बैठका होतील. या पुढच्या बैठका भोपाल, कोलकाता येथ पार पडणाऱ्या होत्या. मात्र, समन्वय समिती नेमल्यानंतर या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
संजय राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांनी येत्या 13 सप्टेंबरला दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित राहतील. समन्वय समितीमध्ये जसा निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे काम सुरु ठेऊ असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या. त्यातील पहिली पाटणा येथे दुसरी बंगळुरु आणि तिसरी मुंबई येथे. या बैठकांचा क्रम पाहता पुढच्या संभाव्य बैठका दिल्ली, भोपाळ, चेन्नई किंवा कोलकाता इथे होतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मुंबई येथील बैठकीतच विविध समित्यांची स्थापना झाली. त्यामुळे या समित्यांमध्येच पुढे धोरण ठरवले जाईल, असे समजते.
मोठ्या बैठका टाळून आता आघाडीतील समित्यांच्या बैठका पार पडतील. समन्वय समिती ही या समित्यामधील एक महत्त्वाची समिती आहे. या समितीमध्ये शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या 13 तारखेला दिल्लीतील आपल्या निवास्थानी एक बैठक बोलावली आहे.