World Blood Donor Day 2020: रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी Facebook ची घेतली जाणार मदत- डॉ. प्रदीप व्यास

यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबिरांसोबतच #Facebook च्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Blood Donate (Photo Credits: Pixabay/Wikimedia Commons)

भारतात अनलॉक 1 (Unlock 1) ला सुरुवात झाली असली तरीही कोरोनाचा धोका अजून टळला नाही. देशात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) असून राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1,04,568 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. राज्यात रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आता आरोग्य विभाग विशेष उपक्रम राबविणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. जागतिक रक्तदान दिनाचे (World Blood Donate Day) औचित्य साधून हे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची देखील मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाणार अशी माहिती प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

कोरोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात रक्ताची गरज असणाऱ्यांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबिरांसोबतच #Facebook च्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. World Blood Donor Day 2020: 'जागतिक रक्तदाता दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या यंदाची Theme आणि रक्तदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी

कशी असेल सेवा

राज्यभरातील 71 शासकीय रक्तपेढ्यांची #Facebook च्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी केली. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल

आवश्यक त्या गटाचे रक्त वेळीच उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा विश्वास प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दाखवला आहे.