Income Tax Raids in Nanded: आयकर विभागाची नांदेडमध्ये धाड, 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त

करचुकवेगिरी प्रकरणात ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

आयकर विभागाने (Income Tax Department) नांदेड येथील फायनान्स कंपन्यांवर टाकलेल्या धाडीत (Tax Raid Nanded) 72 तासांच्या शोधमोहीमेनंतर तब्बल 14 कोटी रुपये रोख आणि 8 किलो सोन्यासह 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. करचुकवेगिरी प्रकरणात ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारी फायनान्स (Bhandari Finances Nanded) आणि आदिनाथ अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Adinath Urban Multistate Co-operative Bank) आवारात टाकलेल्या धाडीदरम्यान घेतलेल्या झडतीमध्ये रोख रक्कम आणि सोने सापडले. जप्त केलेल्या रोख रकमेची काळजीपूर्वक मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागल्याचे समजते.

भंडारी बंधुंचे व्यावसायिक वित्त साम्राज्य

नांदेड जिल्ह्यात विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी या भावांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक मालकीचे मोठे वित्त साम्राज्य आहे. या साम्राज्यातून या भावंडांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन टाकलेल्या धाडीत इतक्या मोठ्या प्रमाणावर घबाड सापडले. (हेही वाचा, Income Tax on Congress: काँग्रेसला मोठा दिलासा, कर्जाच्या वसुलीसाठी जबरदस्ती करणार नाही; इन्कम टॅक्स विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण)

आयकर विभागाकडून सलग तीन दिवस कारवाई

आयकर विभागाने विविध पथकांच्या माध्यमातून 10 मे ते 12 मे या कालावधीत पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे अनेक धाडी टाकल्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. सुमारे 25 खाजगी वाहनांचा समावेश असलेल्या या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यासह विविध ठिकाणी बारकाईने शोध घेतला.

खासगी निवासस्थानांवरही धाड

दरम्यान, नांदेड येथील पारस नगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर आणि काबरा नगर येथील खाजगी निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले. ज्यामुळे तपासाची व्याप्ती अधिक प्रमाणावर अधोरेखीत झाली. नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाने धाड टाकण्याची ही पहिलीच घटना आहे.

आयकर विभागाने या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत रोख रक्कम, आठ किलो सोने आणि मालमत्ता जप्त केल्याची कारवाई केली आहे. असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाली आहे किंवा नाही याबाबत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. दरम्यान, या कारवाईची संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, ज्या समुहावर कारवाई करण्यात आली त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. भंडारी फायनान्स आणि आदिनाथ अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेने अधिकृत प्रतिक्रिया दिल्यास त्यांची बाजू समजू शकणार आहे.