प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या BVG Group कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
प्रामुख्याने विविध कंपन्या आणि संस्थांना स्वच्छता सुविधा आणि कर्मचारी वर्ग पुरवण्याचे काम ही कंपनी करते. राष्ट्रपती भवन आणि अनेक नामवंत कंपन्यांना स्वच्छता सुविधा आणि कर्मचारी वर्ग बीव्हीजी ग्रुप पुरवतो.
वैद्यकीय सेवा, बियाणं, खतं आणि किटकनाशके निर्मिती अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बीव्हीजी ग्रुप (BVG Group) कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहे. आयकर विभागाची छापेमारीची कारवाई अद्यापही सुरुच असल्याची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे बीव्हीजी ग्रुपचं कार्यालय आहे. या कार्यालयावर आयकर विभाग (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी आज (6 नोव्हेंबर 2019) पहाटे छापा टाकला. त्यानंतर बीव्हीजीच्या मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि दिल्ली (Delhi) येथील कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यामुळे पुण्यातील औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड (Hanmantrao Gaikwad) हे या बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन आहेत. आम्ही नियमबाह्य काहीही केले नाही. त्यामुळे केवळ आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
बीव्हीजी ग्रुप वैद्यकीय सेवा, बियाणं, खतं आणि किटकनाशके निर्मिती अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. प्रामुख्याने विविध कंपन्या आणि संस्थांना स्वच्छता सुविधा आणि कर्मचारी वर्ग पुरवण्याचे काम ही कंपनी करते. राष्ट्रपती भवन आणि अनेक नामवंत कंपन्यांना स्वच्छता सुविधा आणि कर्मचारी वर्ग बीव्हीजी ग्रुप पुरवतो. (हेही वाच, गोकूळ दूध संघावर आयकर विभागाचा छापा, सहकार क्षेत्रात खळबळ)
आयकर विभागाने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना बीव्हीजी ग्रुप चेअरमन हनमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही कोणतेही काम नियमबाह्य पद्धतीने केले नाही. त्यामुळे ही कारवाई पूर्णपणे द्वेषापोटी करण्यात आली आहे. आम्ही चौकशीला सामोरे जाणार आहोत. तसेच, चौकशीला पूर्ण सहकार्यही करणार आहोत, असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच, आमच्या कंपनीची प्रगती होत आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.