Thane: उल्हासनगरमध्ये कालीमाता मंदिराचा चौकीदारचं बनला चोर; 12 तोळे सोने घेऊन काढला पळ

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल पडवळ यांनी विशेष पथक पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Theft (PC - Pixabay)

Thane: ठाण्यातील (Thane) उल्हासनगर (Ulhasnagar) कालीमाता मंदिरात (Kalimata Temple) चौकीदार (Watchman) म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या साथीदारासह मंदिरातील 12 तोळे सोनं लंपास करून पळ काढला. रमेश रावल असं या चौकीदाराचं नाव आहे. चोरीवर पांघरूण घालण्यासाठी रमेश मंदिरातील सीसीटीव्ही सोबत घेऊन तो फरार झाला. ​​रमेश रावल हा कालीमाता मंदिरात चौकीदार म्हणून नोकरीला होता.

याप्रकरणी कल्याणमधील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल पडवळ यांनी विशेष पथक पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मंदिरातील देवाच्या मूर्तीतून सोने चोरीला गेल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Nagpur Car Accident: कारच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह दोन जखमी, तिघांना अटक, संतप्त जमावाने फोडल्या काचा (Watch Video))

चोरी करणाऱ्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. रमेश रावल तीन दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू होण्यापूर्वी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात रेकी करत असे. त्याने मंदिराचा संपूर्ण परिसर आणि मंदिराभोवतीचा मार्ग लक्षात घेऊन ही चोरी केली. त्याच्यावर आधीपासून आम्हाला संशय होता, असे मंदिराच्या विश्वस्तांनी म्हटले आहे.

मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, कालीमाता मंदिर 65 वर्षे जुने आहे. या मंदिरात लोक मोठ्या भक्तिभावाने येतात. मंदिराचे सरचिटणीस सुरजित बर्मन यांनी सांगितलं की, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे.