चिंताजनक! Covid-19 च्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळण्याची शक्यता; CM Uddhav Thackeray यांनी दिले 'हे' निर्देश

येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका, त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी बैठक घेऊन कोविडसंदर्भातील (Coronavirus) उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून, प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे असे त्यांनी संगोतले.

सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये अशा विविध महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत 30 ते 50 वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारने 'पश्चिम बंगाल' आणि 'उत्तर प्रदेश' यांना कोरोना संवेदनशील राज्ये म्हणून केले घोषित, राज्यात प्रवेश करणा-यांना RT-PCR चाचणी अनिवार्य)

सध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटिलेटर्स  पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.