Pune: पुण्यात आता कोयता खरेदीसाठीही दाखवावं लागणार आधार कार्ड; शहरातील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोयता किंवा चाकूने लोकांवर हल्ले करून दहशत माजवण्याच्या अनेक घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Pune: विद्येचे माहेरघर असेलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा (Koyta) वापर करून दहशत निर्माण करणाऱ्यां गुंडाचा सुळसुळात सुटला आहे. आता पुणे पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे. पुण्यात यापुढे कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) दाखवणं बंधनकारक असणार आहे. विक्रेत्यांना सामान्यतः शेती आणि नारळ फोडण्यासाठी वापरल्या जाणार्या साधनाच्या खरेदीदारांचे आधार कार्ड तपशील रेकॉर्ड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोयता किंवा चाकूने लोकांवर हल्ले करून दहशत माजवण्याच्या अनेक घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
पुणे पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी अलीकडेच कोयता संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शहरभर चोवीस तास गस्त घालण्यासाठी 450 बीट मार्शल नेमले आहेत. यासंदर्भात माहिती देताना पोलिस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, खरेदीदारांचे तपशील गोळा करण्याच्या मोहिमेमुळे आम्हाला शेतीच्या साधनाचा वापर शोधण्यात मदत होईल. पुण्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकणारे तरुण हातात कोयते घेऊन पुण्याचा विविध भागात दहशत निर्माण करत आहे. या सर्वांवर आळा घाळण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असणार आहे. (हेही वाचा - Pune Koyta Gang Terror: पुण्यात 'कोयता गॅंग'ची दहशत असताना बोहरी आळीतील एका दुकानात गुन्हे शाखेची कारवाई; 105 कोयते जप्त)
झोन 2 च्या डीसीपी स्मार्तना पाटील म्हणाल्या, मंगळवारी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता ‘कोयता’ खरेदी करण्यासाठी खरेदीदारांना आधार कार्डची छायाप्रत सादर करावी लागणार असून विक्रेते त्याची नोंद ठेवतील. (हेही वाचा - Pune: मैत्रिणीशी बोलतो! शालेय विद्यार्थ्यावर अल्पवयीन मुलाचा कोयत्याने हल्ला)
दरम्यान, धारदार शस्त्राची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांसंदर्भात बोलताना पाटील म्हणाल्या की, अनेक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला विक्रेते परवानगीशिवाय “कोयता” विकत असल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली आहे. यासाठी आमच्या गुन्हे शाखेचे पथक संपूर्ण शहरात तपासणी करत आहेत. नुकतेच आम्ही एका दुकानावर छापा टाकून 100 हून अधिक ‘कोयते’ जप्त केले. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला ‘कोयता’ विक्रेत्यांची नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
पुणे शहर पोलिस विभागातील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, किरकोळ कोयता विक्रेत्यांना CrPC (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) च्या कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कोयता टोळी संबंधित गुन्ह्यांमध्ये अनेक अल्पवयीनांचा सहभाग आहे. मंगळवारी शहरातील नूतन मराठी विद्यालयाजवळ कोयता वापरून झालेल्या हल्ल्यामुळे इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.