Anil Parab On Silver Oak Attack Case: शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या 109 कामगारांना सेवेत घेणे अशक्य - अनिल परब
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या 109 आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केले आहे.
Anil Parab On Silver Oak Attack Case: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या 109 आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे कामगार 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असंही परब यांनी म्हटलं आहे.
राज्यातील बस सेवा परत सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पाच महिने बंद असलेल्या बसगाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी बस आगारांनी तपासणी केली आहे. 22 एप्रिलपर्यंत एसटी कामगार कामावर आले नाहीत, तर कंत्राटी खासगीकरण करता येईल का? याचा विचार सुरू आहे. एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असंही परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Protest Outside Silver Oak: शरद पवारांच्या घराबाहेर दंगल घडवून आणणाऱ्यांचा माग काढण्यासाठी मुंबई पोलीस आता सायबर सेलची घेणार मदत)
शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला याअगोदरचं मिळाली होती. मात्र, संबंधित पोलीस स्टेशनकडून सिल्व्हर ओकवर पोलीस बंदोबस्त लावण्यात उशीर झाला. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.