उष्णतेचा पारा अजून वाढणार; 2 जून पर्यंत तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता: हवामान खात्याचा अंदाज

याचा सर्वात जास्त तडाखा विदर्भ आणि मराठवाड्याला बसणार आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील पारा 47 अंशापर्यंत पोहचु शकतो

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

दुष्काळाने (Drought) झाकोळलेल्या महाराष्ट्रात उष्णतेचा उद्रेक वाढत आहे. त्यात आता हवामान विभागाने 2 जून पर्यंत सूर्य असाच आग ओकत राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा सर्वात जास्त तडाखा विदर्भ आणि मराठवाड्याला बसणार आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील पारा 47 अंशापर्यंत पोहचु शकतो असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी लोकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी चंद्रपूर येथे 48 अंश इतके तापमान नोंदवले गेले आहे.

याबाबत बोलताना हवामान विभाग, पुणेचे  प्रमुख अनुपम कश्यप म्हणाले, ‘पावसाने दडी, मारल्याने तसेच मान्सूनचे उशिरा आगमन होणार असल्याने, मराठवाडा आणि विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत 2 जून पर्यंत उष्णतेची लाट वाहणार आहे.’ उष्णतेचा सर्वात जास्त फटका सामान्य नागरिकांना पाण्याच्या कमतरतेच्या रूपाने होत आहे. सध्याची पाण्याची कमतरता पाहता, राजधानी मुंबईमध्ये, हिवाळ्यापासून 10 टक्के पाणी कपात केली जात आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि मीरा भायंदरसह अनेक भागात आठवड्यातून 30 तासांपेक्षा जास्त पाणी कपात झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. (हेही वाचा: आटलेली विहीर अजून खोदली, आता तासाला एक घागर पाणी; 2 हंडा पाण्यासाठी महिला रात्रभर रांगेत)

राज्यातील 28 हजार 524 गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले गेले आहे. यापैकी 17 हजार 985 गावांना दुष्काळग्रस्त अनुदान दिले जात आहे. याव्यतिरिक्त, 10 हजार 539 गावांमध्ये अतिरिक्त सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागात जनावरांना चारा आणि पाणी देण्यासाठी 1501 ठिकाणी चारा छावण्या उभारल्या आहेत. यावर उपाययोजन म्हणून महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पाऊस पडण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.