IIT Bombay Placements: आयआयटी बॉम्बेच्या प्लेसमेंटमध्ये मोठी घट; तब्बल 36% विद्यार्थ्यांना अद्याप मिळाल्या नाहीत नोकरीच्या ऑफर्स
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आयआयटी बॉम्बे प्लेसमेंटवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
IIT Bombay Placements: आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी नववी-दहावीपासूनच तयारी सुरू करतात. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर करियर सेट होते, हा त्यामागचा हेतू आहे. मात्र आता याबाबत आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) एक वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. आयआयटीकडूनही कॅम्पस प्लेसमेंट मिळत नसल्याचे दिसून आले आहे. जानेवारीत एक बातमी आली होती की, आयआयटी बॉम्बेच्या 85 विद्यार्थ्यांना वर्षाला 1 कोटी रुपयांच्या जॉब ऑफर आल्या आहेत. मात्र ताजे अपडेट असे आहे की, यावर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बेच्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही.
सध्या आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंट सुरू आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर मिळाल्या नसल्याची बातमी आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, आयआयटी बॉम्बेच्या 2000 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना या सत्रात अद्याप प्लेसमेंट मिळालेले नाही. ग्लोबल आयआयटी माजी विद्यार्थी सपोर्ट ग्रुप धीरज सिंग यांनी हा डेटा शेअर केला आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे जी मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी या शाखेतील विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट मिळते. मात्र या शाखेतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या वर्षी आयआयटी बॉम्बेतील 32.8 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. आतापर्यंत प्लेसमेंट मिळवू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोंदणीकृत 2,209 विद्यार्थ्यांपैकी 1,485 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. अहवालात म्हटले आहे की आयआयटी-बॉम्बेच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक मंदीमुळे प्लेसमेंट सीझनसाठी कंपन्यांना कॉल करणे कठीण झाले आहे. (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Adhyasan Center: दिल्लीच्या JNU मध्ये सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र; केला जाणार महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास)
दरम्यान, देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेची ही अवस्था खरोखरच विचार करायला भाग पाडणारी आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आयआयटी बॉम्बे प्लेसमेंटवर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.