एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली तर याचा अर्थ शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे, असा होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तरीही ती कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्यास तिची संमती मानली जाऊ शकत नाही. कोर्टाने सांगितले की, रूम बुक करण्यात पीडित आणि आरोपी दोघांची भूमिका असल्याचे पुरावे आहेत.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली तर याचा अर्थ शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे, असा होत नाही, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) गोवा खंडपीठाने आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयात नोंदवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भरत पी देशपांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हा युक्तिवाद देत उच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये आरोपी गुलशेर अहमदविरुद्धचा खटला बंद केलेल्या बलात्कार प्रकरणातील ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला.

महिला पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली याचा अर्थ शारीरिक संबंध ठेवण्यास तिची संमती आहे असं नाही -

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, जरी हे मान्य केले गेले की, महिला पुरुषासोबत खोलीत गेली होती. तरीही ती कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्यास तिची संमती मानली जाऊ शकत नाही. कोर्टाने सांगितले की, रूम बुक करण्यात पीडित आणि आरोपी दोघांची भूमिका असल्याचे पुरावे आहेत. परंतु याला कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याची संमती म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. (हेही वाचा - Mumbai: सूरतमधील व्यक्ती 14 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली; पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

ट्रायल कोर्टाने काय म्हटले?

या बलात्कार प्रकरणावर सुनावणी करताना ट्रायल कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, आरोपीसोबत हॉटेलची खोली बुक करण्यात महिलेची महत्त्वाची भूमिका होती आणि ती आरोपीसोबत त्या खोलीतही गेली होती. त्यामुळे तिने खोलीतील पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली होती. त्यानंतर ट्रायल कोर्टाने डिस्चार्जचे आदेश दिले. या आदेशानंतर आरोपींवरील बलात्काराचा खटला बंद करण्यात आला. मात्र, आता उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळून लावला आहे.  (हेही वाचा, Pune Crime: हरवलेली मांजर शोधण्याच्या बदल्यात महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी; पुणे येथील धक्कादायक प्रकार)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण मार्च 2020 मध्ये उघडकीस आले. आरोपीने तिला परदेशात खासगी नोकरीची ऑफर दिल्याचा आरोप पीडितेने केला होता. आरोपीने नोकरीसाठी एजन्सीला भेटण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत आणून फसवणूक केली. पीडितेने आरोप केला आहे की, ती खोलीत शिरताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा आरोपी बाथरूममध्ये गेला तेव्हा तिने खोली आणि हॉटेलमधून पळ काढला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.